ग्लासगो भ्रमण – पश्चिमार्ध
जगातील बहुतेक शहरांमध्ये जशी एक मुख्य नदी असते तशीच ग्लासगोची पण क्लाईड नदी आहे . एकेकाळी ग्लासगो शहराची भरभराट याच नदीमुळे झाली होती . स्कॉटलंडचा जगभराशी , प्रामुख्याने युरोपशी व्यापार याच नदीतून चालायचा . ग्लासगो हे जगातील जहाज बांधणीचे एक प्रमुख केंद्र होते . अर्थातच ते सुद्धा क्लाईड नदीकाठी असलेल्या शिपयार्ड मुळेच . अशी ही ग्लासगो ची जीवनदायिनी शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते . याच नदीलगत असलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही शहराच्या पश्चिमार्धात प्रवेश केला . स्कॉटलंडमध्ये आणि खासकरून ग्लासगोमध्ये पाण्याइतकच ( काहींसाठी कदाचित थोड ं जास्तच ) महत्व ज्या द्रव्याला आहे ते म्हणजे स्कॉच व्हिस्की . स्कॉटलंडला बरच द्रव्य ( पैसा ) मिळवून देणारं हे द्रव्य . त्याच्या उत्पादनाचं ग्लासगोतील एक मुख्य ठिकाण म्हणजे क्लाईड डिस्टीलिअरी. आम्ही ती बाहेरूनच ओझरती पाहून पुढे गेलो. तिथून जरासं पुढे गेलं की स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस अर्थात एस इ सी लागतं. इथे एकूण तीन वास्तू दिसतात. एस इ सी सेंटर ही त्रिकोणाकृती प्रवेशद्वार असलेली सर्वात प्रथम बांधली गे...