दिवाना परवाना
मे २०१८ च्या सुमारास मी आणखीन एक प्रोजेक्ट सुरु केला, तो म्हणजे ड्रायविंग शिकण्याचा. प्रोजेक्ट इतक्यासाठी कारण तिथे ड्रायविंग शिकून लायसन्स मिळवण्यासाठी भरपूर वेळ, पैसे आणि नशीब खर्ची घालावं लागतं. खरंतर माझ्याकडे गेली सुमारे १२ वर्ष भारतातलं लायसन्स होतं आणि किमान दोन वर्ष मी पुण्यात नियमितपणे माझी गाडी चालवत होतो. पण इथे गाडी चालवणं आणि पुण्यात गाडी “चालवणं" यात जमीन असमानाचा फरक आहे. आणि त्यातून लायसन्सची परीक्षा म्हणजे तर अग्निदिव्यच! तिथे मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या पाठोपाठ बहुदा गाडीचा नंबर लागतो. युकेमध्ये प्रत्येक घरामागे १.२ गाड्या आहेत. त्यातून स्कॉटलंडमध्ये तर मुख्य शहरं वगळता सार्वजनिक वाहतूक यथातथाच आहे. तेंव्हा स्वतःच्या वाहनाला पर्याय नाही. माझा तिथे राहण्याचा कालावधी निश्चित नसल्याने अगदी लगेच गाडी विकत घेण्याचा विचार नव्हता. पण लायसन्स काढून किमान गाडी भाड्यानी घेऊन तरी कुठेतरी फिरत येईल अशी अपेक्षा होती. गाडी न घेण्याचा निर्णय हा योग्यच ठरला. पुढे कोव्हिडच्या काळात जेंव्हा अचानक मायदेशी परतावं लागलं तेंव्हा त्याचा प्रत्यय आला. त्यातून तिथे ...