दिवाना परवाना

मे २०१८ च्या सुमारास मी आणखीन एक प्रोजेक्ट सुरु केला, तो म्हणजे ड्रायविंग शिकण्याचा. प्रोजेक्ट इतक्यासाठी कारण तिथे ड्रायविंग शिकून लायसन्स मिळवण्यासाठी भरपूर वेळ, पैसे आणि नशीब खर्ची घालावं लागतं. खरंतर माझ्याकडे गेली सुमारे १२ वर्ष भारतातलं लायसन्स होतं आणि किमान दोन वर्ष मी पुण्यात नियमितपणे माझी गाडी चालवत होतो. पण इथे गाडी चालवणं आणि पुण्यात गाडी “चालवणं" यात जमीन असमानाचा फरक आहे. आणि त्यातून लायसन्सची परीक्षा म्हणजे तर अग्निदिव्यच!

तिथे मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या पाठोपाठ बहुदा गाडीचा नंबर लागतो. युकेमध्ये प्रत्येक घरामागे १.२ गाड्या आहेत. त्यातून स्कॉटलंडमध्ये तर मुख्य शहरं वगळता सार्वजनिक वाहतूक यथातथाच आहे. तेंव्हा स्वतःच्या वाहनाला पर्याय नाही.

माझा तिथे राहण्याचा कालावधी निश्चित नसल्याने अगदी लगेच गाडी विकत घेण्याचा विचार नव्हता. पण लायसन्स काढून किमान गाडी भाड्यानी घेऊन तरी कुठेतरी फिरत येईल अशी अपेक्षा होती. गाडी न घेण्याचा निर्णय हा योग्यच ठरला. पुढे कोव्हिडच्या काळात जेंव्हा अचानक मायदेशी परतावं लागलं तेंव्हा त्याचा प्रत्यय आला. त्यातून तिथे माझं ऑफिस अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात होतं. त्यामुळे, गाडी घेऊन अगदी ट्रॅफिकवर मात  करत ऑफिसला पोहोचायचं म्हटलं तरी दिवसाचे १५ पौंड (म्हणजे सुमारे १५०० रुपये) पार्किंगचे खर्च करणं  माझ्या पगारात बसत नव्हतं. तिथे गाडी खरेदी करणं तसं  अगदी सोपं आहे. वापरलेली जरा जुनी पण चांगल्या अवस्थेतली गाडी अगदी तीन-चार हजार पौंडपासून मिळून जाते. परंतु त्यावर इन्शुरन्स नावाचा वार्षिक ८०० ते १००० पौंडाचा बोजा अटळ असतो. शिवाय मेंटेनन्स, इंधन वगैरे खर्च वेगळेच.

तिथे ड्रायविंग शिकताना सगळ्यात पहिले काय करावं लागतं तर आपल्याला येत असलेलं भारतातलं ड्रायविंग विसरावं लागतं. कारण पुण्यात गाडी चालवताना आपला मेंदू एक मूलभूत गोष्ट गृहीत धरून असतो की समोरचा मनुष्य नियम पाळणार नाही. त्यामुळे कालांतरानी सिग्नल तोडणारे, रस्त्यात चुकीच्या बाजूनी गाडी चालवणारे, इंडिकेटर न देता वळणारे, आरसा नसल्याने मागे कोण आहे हे पाहण्याचा संबंधच नसणारे हे वावगे वाटेनासे होतात. म्हणजे असे महाभाग एखाद किलोमीटर दिसले नाहीत तर चुकल्यासारखं वाटू लागतं. पण तिथे मात्र हे गृहीतक पूर्णपणे उलट करून मेंदूला शिकवावं लागतं. परीक्षेसाठीतरी निदान रस्त्यात आपण १००% नियम पाळूनच गाडी चालवायची आहे आणि रस्त्यात इतरही सर्वजण नियम पाळूनच गाडी चालवणार आहेत हे स्वतःला पटवून द्यायलाच खूप वेळ लागतो.

प्रथम एक थेअरी परीक्षा पार करावी लागते. ४५ मिनिटाच्या या परीक्षेत एक भाग असतो तो म्हणजे रस्त्यातील धोके ओळखण्याचा. गाडी चालतानाचा व्हिडिओ दाखवतात व त्यात तुम्हाला संभाव्य धोके ओळखायचे असतात. थोडस व्हिडिओ गेम खेळल्यासारखं वाटतं. संभाव्य धोका म्हणजे रस्त्यावरची अशी कोणतीही हालचाल ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेग अथवा दिशा बदलावी लागेल. मनात विचार आला की अशी परीक्षा आपल्याकडच्या रस्त्यावरचे खरे व्हिडिओ दाखवून घेतली तर धोकेच धोके चोहीकडे अशी परिस्थिती होईल.

त्या परीक्षेतून पार झाल्यावर मात्र खरी परीक्षा असते ती म्हणजे प्रात्यक्षिक. ४० मिनिट परीक्षक तुमच्या बाजूला बसतो आणि तो सांगेल तसं तसं  तुम्ही चालवायचं. सगळ्यात आधी गाडीत बसण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांची तपासणी होते. दोन ते तीन गाड्यांच्या लांबीइतक्या अंतरावरून तुम्हाला गाडीचा नंबर वाचायला लावतात. ते झालं की मग गाडीत बसून मुख्य परीक्षा सुरु. नियम खरंतर सोपे आहेत. कोणत्याही क्षणी परीक्षकाला गाडीचा कंट्रोल हातात घेण्याची गरज पडली की तुम्ही नापास. आणि तसा क्षण तुम्ही ४० मिनिटं येऊ दिला नाही तर पास. त्याशिवाय अगदी बारीक सारीक गोष्टी जसं  की वळताना दोन दोनदा आरसे बघणे, थांबलेली गाडी सुरु करताना इंडीकेटर देणे किंवा लेनची शिस्त अत्यंत काटेकोरपणे पाळणे इत्यादीमध्ये जरा जरी काही चुकलं तरी मार्क कापले जातात. असे १५ मार्क गेले तरीही नारळ देऊन पुनरागमनाचे आमंत्रण देण्यात येते. ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे साधारण शंभरात ३८ इतकंच आहे.

सुदैवानी मी दोन्ही परीक्षा एकाच फटक्यात पार झालो. प्रात्यक्षिक परीक्षेत एक क्षण असा आलेला की परीक्षक गाडीचा कंट्रोल हाती घेणारच होता पण अगदी ऐनवेळी मी गाडी सावरली आणि धोका टळला. आणखीन एक मजेशीर किस्सा झाला. शक्यतो तुम्ही ज्या प्रशिक्षकाकडे शिकता तो तीच गाडी प्रात्यक्षिकाच्या दिवशी घेऊन येतो. म्हणजे तुमचा हात व्यवस्थित बसलेली गाडीच तुम्हाला परीक्षेच्या वेळी हातात असते. माझ्या प्रात्यक्षिकाच्या दिवशी नेमकी ती गाडी बंद पडली होती. तेंव्हा दुसरी पर्यायी गाडी हाती अली जी मी प्रथमच चालवत होतो. सहाजिकच काही कंट्रोल्स थोडेसे वेगळे होते. परीक्षेदरम्यान मला पठिमागच्या काचेचा वायपर चालू करायला सांगण्यात आला. तो मी चालू तर केला. पण नंतर बंद करायला गेलो तर तो होतीच ना. बरीच धडपड करूनही तो बंद कसा करायचा ते सापडेना. शेवटी परीक्षकच म्हणाला की ते सोडून ड्रायविंगवर लक्ष दे. आणि मग चाळीसातली  उरलेली मिनिटं  तो वायपर तसाच कू कू करत राहिला.

अशा प्रकारे दिवाना बनून सुमारे दोन महिन्याचा वेळ आणि बऱ्यापैकी पैसे खर्ची घालून अखेर तो वाहनचालकाचा परवाना हाती आला. थोड्याशा कठीण परीक्षेतून जावं लागलं असलं तरी मी चांगलं ड्रायविंग आणि मुख्य म्हणजे पेशन्स शिकलो. कितीही त्रासदायक वाटली तरी अशा प्रकारची कठीण परीक्षा रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीनी खूप महत्वाची आहे. आपल्याकडेही असे कठोर नियम आणण्याची गरज आहे.

- हृषिकेश

hnagarkar@gmail.com

Comments

  1. Khupach mast lihilay… masa pan Australia Madhekar Anubhav agdi sarkha aahe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न खाणारा ते खाणारा

आतिषबाजी