आतिषबाजी

“रात्र मोठी अन सोंग थोडी". म्हण जराशी उलटी सुलटी झाली ना. पण स्कॉटलंडला विंटरमध्ये खरोखर तसंच  होतं. ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी डे लाईट सेविंग बंद होतं. घड्याळं एका तासानी मागे सरकवली जातात आणि युके पुन्हा एकदा ग्रीनीच  मीन टाइम किंवा जी. एम. टी. वर येतं. आणि मग तेव्हापासून हळूहळू सुरुवात होते ती कंटाळवाण्या अंधाऱ्या मोठ्याच मोठ्या रात्रींची. डिसेंबर जानेवारीपर्यंत दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास काळोख होतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठला कुठे झुंजूमुंजू होऊ लागतं..

ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बघता बघता ऋतुमान बदलून जातं. झाडांची पानं झटपट हिरव्याची पिवळी, पिवळ्याची लाल आणि लालची मातकट होऊन झाडांवरून खाली उतरतात. वाळक्या पानांचा जमिनीवर दिवसागणिक ढीग जमा होतो. तसं झालं की मग माझ्या मुलीसोबत मीपण तो पालापाचोळा पायाखाली चुरत चालायची मजा घ्यायचो. मात्र त्यात पाऊस पडला की त्याच पाचोळ्याचं रूपांतर चिखलात होतं.

ऑक्टोबरमध्ये तिथे एक आगळावेगळा सण असतो तो म्हणजे हॅलोविन. भुताखेतांच्या गोष्टी, भीतीदायक वेशभूषा, भोपळ्यात कोरलेले मॉन्स्टर अशा सगळ्या गोष्टींचा हा सण. मग “ट्रीक  ऑर  ट्रीट” म्हणत चॉकलेट्स गोळा करत मुलं इकडेतिकडे फिरतात. कदाचित लवकरच येऊ घातलेल्या अंधाऱ्या रात्रींची भीती घालवण्यासाठी असा सण साजरा करण्याची प्रथा पडली असावी. हल्ली आपल्याकडेही कुठे कुठे ह्या सणाचा शिरकाव झालेला दिसतो.

नोव्हेंबरमध्ये तिथे बॉनफायर नाईट असते. ह्या बॉनफायर नाईटची एक ऐतिहासिक गोष्ट आहे. ५ नोव्हेंबर १६०५ ला गाय फॅक्स नावाच्या इसमाला अटक करण्यात अली होती. त्यातून युकेच्या पार्लमेंटच्या तळघरात दडवलेल्या स्फोटकांचा कट उघडकीस आला आणि राजा पहिला जॉर्ज याचा जीव वाचला. तेव्हापासून “राजा वाचला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला” ह्या पौराणिक कथांच्या उक्तीप्रमाणे बॉनफायर नाईट साजरी करण्याची प्रथा प्रचलित झाली.

त्याच प्रथेचा भाग म्हणून नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या नगरपालिका अतिषबाजीचं आयोजन करतात. सरकारी खर्चातून सुमारे २०-३० मिनिटं आकाशभर तऱ्हेतऱ्हेचे फटाके उडवण्यात येतात. सर्व तांत्रिक व्यवस्था प्रोफेशनली केलेली असते.  दूरवरून काळोख्या रात्रीच्या पटलावर साकारण्यात येणारी ही बहुरंगी कलाकृती पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. फोटोग्राफर्ससाठी तर ही  पर्वणीच असते. वेळेआधीच तिथे पोहोचून शक्य तितका चांगला स्पॉट निवडून सर्वजण फटाके उडण्याची आणि पाऊस न पडण्याची वाट पहात असतात. लहान मुलं तिथे आधीच अती उत्साहात असतात. त्यांचा “उत्साह” आणखीन वाढवायला तिथे जवळपासच लाईटवाले फुगे, लाईटवाली भिरभिरी, खाऊ अशा विविध गोष्टी विकायला असतात. कुडकुड थंडीत जाडजूड जॅकेट्समध्ये वाऱ्यावर उभे राहून बॉनफायर नाईटची आतिषबाजी बघून मंडळी घरी परततात. मग बरेच जण त्या सुमारास घरी पण आणून फटाके उडवतत. त्याचा आपल्याला फायदा असा होतो की तेच फटाके आपण दिवाळीच्या नावानं उडवू शकतो.

नोव्हेंबरमध्ये आणखीन एक महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे ब्लॅक फ्रायडे. अमेरिकेत थॅंक्सगिविंग डेच्या नंतर येणारा दिवस ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या दिवसाचं माहात्म्य हेच की त्या दिवशी सर्व दुकानांमध्ये भरघोस सवलती असतात, मग ते ऑनलाईन असोत किंवा बाजारातली. त्याचा परिणाम म्हणून लोकं अक्षरश: दिवस रात्र एक करून शॉपिंग करतात. आणि मग “अमेरिकेतील लोक शॉपिंग करणार तर आम्हाला का नको” म्हणत युके आणि युरोपमध्ये ही प्रथा सुरु झाली.

नोव्हेंबरपासूनच युके आणि सर्वच युरोपीय देशांमध्ये बाजारांमध्ये वातावरण बदलू लागतं. वर्षातील सर्वात मोठ्या सणाची तयारी करायला महिनाभरतरी लागणारच ना! सगळीकडे ख्रिसमसचे वारे वाहू लागतात. दुकानांमध्ये, मॉल्समध्ये, रस्त्यांवर, ऑफिसांमध्ये डिसेंबर सुरु होईपर्यंत ख्रिसमसचं डेकोरेशन दिसू लागतं. शहराच्या मुख्य भागांमध्ये सुंदर रोषणाई केली जाते, जत्रा लागतात. निरनिराळे इव्हेंट्स जसे की ख्रिसमस डीनरवगैरे सुरु होतात. डिसेंबरच्या मध्यापासूनच ऑफिसं रिकामी दिसू लागतात ती थेट जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत. आता इतकी मोठी तयारी झाल्यावर आपल्याला वाटतं कि तिथे ख्रिसमसचा दिवस म्हणजे नुसता धुमधडाका असेल. पण वस्तुस्थिती त्याच्या अगदीच उलट असते. २५ डिसेंबरला सर्वत्र अती शांतता असते. तिथे ख्रिसमस हा सण कुटुंबासोबत घरच्या घरी साजरा करण्याची पद्धत आहे. आणि मग ही संधी सर्वच्या सर्व लोकांना मिळाली पाहिजे हा विचार आहे. त्यामुळे त्या दिवशी तिथे सर्व दुकानं, हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक, बहुतांशी कॅब्स, दवाखाने, इत्यादी सर्व बंद असतं. इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि अगदी तुरळक वाहतूकव्यवस्था वगळता सर्व व्यवहार त्या दिवशी पूर्णपणे बंद असतात. पहिल्या वर्षी ही गोष्ट आम्हाला खूपच अजब वाटली होती. कारण आपल्याकडे ख्रिसमस म्हटलं की सुट्टी आणि धमाल इतकंच ठाऊक होतं.

ख्रिसमसनंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे बॉक्सिंग डे. आता ह्या बॉक्सिंग डेचा आणि मुष्टियुद्धाचा काहीएक संबंध  नाही. बॉक्सिंग डे हा आणखीन एक सवलती आणि शॉपिंगसाठी राखीव दिवस. ख्रिसमसच्या दिवशी शांतिः शांत झालेली सगळी दुकान ह्या दिवशी पुन्हा गजबजून जातात. लोकं अगदी पहाटेपासून दुकानाबाहेर रांगा लावून कधी एकदा दुकान उघडतंय आणि कधी एकदा हेरून ठेवलेले चांगले चांगले कपडे, बॅग्स, शूज, वगैरे घेतोय अशा तयारीत असतात. मी बॉक्सिंग डेला कधी शॉपिंग केलं नाही असं नाही. पण त्यासाठी कडाक्याच्या थंडीत पहाटेपासून काळोखात रांगा लावण्याची भानगड मला कधीच झेपली नाही. आम्ही आपले नऊ दहा वाजता सगळ्या टॉप सेलिंग गोष्टी संपल्या की अस्ताव्यस्त झालेल्या दुकानांमध्ये काही उरल्या सुरल्यात चांगलं मिळतंय का ते बघायला जायचो. गंमत म्हणजे त्यातही आमचं चिक्कार शॉपिंग व्हायचं. आमच्यासाठी तेच खूप जास्त असायचं.

त्याला जोडूनच पाठोपाठ येतं इयर एन्ड. ३१ डिसेंबरलासुद्धा पुन्हा एकदा शहराच्या मुख्य मध्यवर्ती ठिकाणी आतिषबाजी होते. मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सगळा माहोल काही औरच असतो. थंडी काळोख ह्या सर्व त्रासदींमधून वाट काढत वर्षातील सगळ्यात मोठ्या सणाचं सेलिब्रेशन पार पडतं. त्यातच कुठेतरी उरलेले कडक थंडीचे आणि काळोखाचे महिने झेलायचं मानसिक बळ मिळतं असं मला वाटतं. अशा उत्साहातच नवीन वर्ष सुरु होतं आणि निसर्गाच्या ऋतुचक्रासोबत आपणही पुढे सरकत रहातो.

- हृषिकेश

hnagarkar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

न खाणारा ते खाणारा

दिवाना परवाना