ग्लासगो भ्रमण – पश्चिमार्ध
जगातील बहुतेक शहरांमध्ये जशी एक मुख्य नदी असते तशीच ग्लासगोची पण क्लाईड नदी आहे. एकेकाळी ग्लासगो शहराची भरभराट याच नदीमुळे झाली होती. स्कॉटलंडचा जगभराशी, प्रामुख्याने युरोपशी व्यापार याच नदीतून चालायचा. ग्लासगो हे जगातील जहाज बांधणीचे एक प्रमुख केंद्र होते. अर्थातच ते सुद्धा क्लाईड नदीकाठी असलेल्या शिपयार्ड मुळेच. अशी ही ग्लासगो ची जीवनदायिनी शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. याच नदीलगत असलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही शहराच्या पश्चिमार्धात प्रवेश केला.
स्कॉटलंडमध्ये आणि खासकरून ग्लासगोमध्ये पाण्याइतकच ( काहींसाठी कदाचित थोडं जास्तच ) महत्व ज्या द्रव्याला आहे ते
म्हणजे स्कॉच व्हिस्की. स्कॉटलंडला बरच द्रव्य (पैसा) मिळवून देणारं हे
द्रव्य. त्याच्या उत्पादनाचं ग्लासगोतील एक मुख्य ठिकाण म्हणजे क्लाईड डिस्टीलिअरी.
आम्ही ती बाहेरूनच ओझरती पाहून पुढे गेलो.
तिथून जरासं पुढे गेलं
की स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस अर्थात एस इ सी लागतं. इथे एकूण तीन वास्तू दिसतात. एस इ सी सेंटर ही त्रिकोणाकृती प्रवेशद्वार असलेली सर्वात प्रथम बांधली गेलेली वास्तू आहे. त्याच्या एका बाजूला आर्माडिलो नावाच्या प्राण्याच्या
आकारासारख दिसणारं आणि तेच नाव धारण करणारं ऑडिटोरियम
आहे. पुढे
नंतर एकदा ह्या ऑडीटोरीममध्ये एक कार्यक्रम पाहण्याचा आम्हाला योग आला. सुमारे ३००० आसनव्यवस्था
असणारी ही वस्तू प्रशस्त आणि भव्य दीव्य आहे. पण त्याहीपेक्षा भव्य अशी तिसरी वस्तू आहे एस एस इ हायड्रो. या गोलाकार वास्तूमध्ये एकूण १४३०० आसनव्यवस्था आहे. मोठमोठ्या कॉन्सर्ट्स इथे होतात. ह्या इमारतीची आणखीन एक खासियत म्हणजे रात्रीच्या वेळी अक्ख्या बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूस दिसणारी रंगीबेरंगी रोषणाई.
त्यानंतर पुढे मला प्रचंड आवडलेली जागा म्हणजे रिव्हर साईड म्युझिअम. त्यालाच ट्रान्सपोर्ट म्युझिअम असंही म्हणतात. हे म्युझिअम ग्लासगो महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने येथे प्रवेश मोफत आहे. नावाप्रमाणेच इथे वाहतुकीची सर्वच्या सर्व साधने ठेवण्यात आली आहेत. अगदी बाबागाडीपासून ते थेट बोटीपर्यंत सर्व प्रकारची वाहन इथे आहेत. बाकी प्रॅमच्या इतक्या तऱ्हा आणि त्यात इतक्या सोयी असू शकतात ह्याचं ज्ञान मला तिथेच झालं. तशी आमच्याकडची प्रॅम माझ्या मुलीनी दोन एक वर्ष त्यात बसण्यासाठी वापरली. मात्र त्यानंतर त्याचा मुख्य उपयोग मालवाहतुकीसाठीच झाला. एका विभागात सायकली आणि मोटर सायकलींचे इतके निरनिराळे प्रकार आहेत की पाहून डोकं चक्रावून जातं. भिंतीलगत अगदी वरपर्यंत त्या मांडून ठेवलेल्या आहेत. एकीकडे तर चक्क खरंखुरं भलंमोठं रेल्वेचं इंजिनही आहे. एका विभागात जुन्या काळातील घोडागाडी, ट्रामचे डबे, जुन्या काळाची बस, इत्यादी वाहनं आहेत. ती बस तर थेट आपल्या लाल डबा एस टी बससारखी दिसतेे. नदीलगतच असलेल्या ह्या म्युझिअमच्या मागे नदीत दी टॉल शीप ग्लेनली नावाची १८९६ साली ग्लासगोतच बनवली गेलेली शिडाची बोट आहे. खूपच चांगल्या स्थितीत असलेल्या ह्या मालवाहू बोटीवर आपल्याला बोटीचे विविध भाग, राहण्याच्या लहानशा खोल्या, नेव्हिगेशन डेक हे सगळं पाहता येतं. म्युझिअमची आणखीन एक खासियत म्हणजे त्याची मॉडर्न वास्तुशैलीत बनवलेली इमारत. ती इतकी अनोखी आहे की बार बार देखो या हिंदी चित्रपटात २०५० सालातील लंडनमधील कोर्टाची इमारत म्हणून ही दाखवली आहे.
रिव्हर साईड म्युझिअमनंतर आम्ही परत टूर बसमध्ये हॉप ऑन केलं आणि तिथून पुढे बस ग्लासगो युनिव्हर्सिटीपाशी आली. इ. स. १४५१ मध्ये स्थापन झालेलं हे विश्वविद्यालय इ. स. १८७० मध्ये सध्या असलेल्या ठिकाणी स्थानांतरित झालं. गिल्मोरहील नावाच्या भागात असलेली ही वास्तू नावाप्रमाणेच “हील” वर आहे. त्यामुळे आजूबाजूला बऱ्यापैकी दूरवरून युनिव्हर्सिटीचा मुख्य टॉवर दिसतो. पण ती हील चढल्याखेरीज काही तुम्ही युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचू शकत नाही. माझी मुलगी जराशी कंटाळू लागल्यामुळे आम्ही बाहेरूनच त्या वास्तूचे दर्शन घेऊन पुढे निघालो.
त्यानंतर केल्विन नदी
ओलांडून बस केल्विनग्रोव्ह आर्ट गॅलरी व म्युझिअमपाशी आली. इथेच मला या केल्विन नदीशी
संबंधित एक गोष्ट समजली. विज्ञानामध्ये तापमान मोजण्यासाठी जे “केल्विन" नावाचं
एकक (युनिट) वापरलं जातं ते ह्या नदीच्या नावाशीच
संबंधित आहे. विल्यम थॉमसन हा आयर्लंडमध्ये जन्मलेला वैज्ञानिक आणि इंजिनीअर
५३ वर्षे ग्लासगो युनिव्हर्सिटीत प्रोफेसर
होता. याच काळात त्याने अनेक शोध लावले. नीचतम तापमानाचा (absolute zero
temperature) शोध हा त्यापैकीच एक. त्याच्या प्रयोगशाळेच्या बाजूनी वाहणाऱ्या केल्विन
नदीमुळेच पुढे त्याला लॉर्ड केल्विन असे नाव प्राप्त झाले. तेच नाव त्याच्या स्मरणार्थ
तापमानाच्या एककालाही दिले गेले. आजही केल्विनेटर सारख्या काही एसी फ्रिज वगैरे बनवणाऱ्या
ब्रँड्सची नावं आपल्याला त्यापासूनच आलेली
दिसतात.
केल्विनग्रोव्ह म्युझिअमसुद्धा ग्लासगो महापालिकेचेच असल्याने हेही
सर्वांसाठी खुलं आहे. इथे सगळ्यात आधी काय भुरळ
घालत असेल तर मुख्य वास्तूच्या समोरील भागात असलेलं मोठं लॉन. ती हिरवळ पार
केली की तुम्ही भव्य प्रवेशद्वारापाशी येता.
आत गेल्यावर विविध दालने आहेत. पहिल्या मजल्यावर खूपसाऱ्या प्राण्यांच्या मोठ्या प्रतिकृती
आहेत. हत्ती, वाघ, सिंह, पोलर बेअर, कासवं, गेंडा इत्यादी अनेक प्राण्यांच्या प्रतिकृती
बघत लहान मुलांसोबत आपणही दंग होऊन जातो. एका दालनात पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल
खूप सुंदर माहितीपूर्ण एक्सिबिशन आहे. वरच्या मजल्यावर अनेक कलाकारांची अत्यंत सुंदर
चित्र आर्ट गॅलरीत आहेत. ह्या वेळेस जरासे आम्ही उशिराच पोहोचलो असल्यामुळे ओझरतंच
पाहून निघालो. मात्र नंतर परत कधी तरी वेळ काढून इथे भेट देण्याचं आम्ही ठरवलं आणि
पुढे काही महिन्यांनी तसा योग आलादेखील.
दिवसभर अशी भटकंती करून
अखेर बस परत जॉर्ज स्क्वेअरपाशी आली. तिथून आम्ही थकून भागून पण अनेक सुंदर आठवणी मनात
घेऊन आणि मनानी ताजे तवाने होऊन घरी परतलो. ग्लासगोशी आता आमची छान दोस्ती झाली होती. वर्षातील सगळ्यात
मस्त असा स्प्रिंग आणि पाठोपाठ समरचा ऋतू येत होता आणि आम्ही आणखीन भटकंतीसाठी सज्ज होतो.
- हृषिकेश
hnagarkar@gmail.com




Comments
Post a Comment