बॅगपायपर्सचे स्कॉटलंड - नूतन वर्षाभिनंदन




माझं ऑफिस ग्लासगो शहराच्या मध्यभागी होतं. शहराचा हा मुख्य भाग तसा लहानसाच. सर्व मुख्य ट्रेन स्टेशन्स, बस स्टॉप्स, दुकानं, मॉल्स वगैरे ऑफिसपासून अगदी चालत जाण्याइतकी जवळ. या शहराच्या मुख्य भागाची खासियत म्हणजे सर्व रस्ते काटकोनात आहेत. बाकी उपनगर या मुख्य सिटी सेंटरपासून चहुबाजूनी  पसरलेलं. जिथे मी घर भाड्यानी घेतलं होतं ते ग्लासगोच्या हद्दीतील पश्चिमेकडील टोक. मुख्य शहरापासून जरासा दूर आणि त्यामुळे शांत असा हा भाग. शहराचा  मुख्य भाग वगळता बाकी सगळीकडे मुख्यत्वे लहान विलग घर, रो हाउसेस किंवा २-३ मजली इमारतीच आहेत. ॲनिसलँडमध्ये मात्र ह्या सर्व लहान बिल्डींग्समधून डोकं वर काढणारी एक २५ मजली सरकारी योजनेतील घरांची इमारत आहे. तिथे खूप साऱ्या इमारती ह्या ४०-५० वर्ष जुन्या आहेत. काही काही तर शंभर वर्ष जुन्यादेखील आहेत. ह्या सर्व एकदम व्यवस्थित राहत्या इमारती आहेत.

सर्व जरुरी कागदपत्रांची पूर्तता करून ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी रात्रीची बस पकडून शनिवारी पहाटे सॉलिहलच्या घरी परतलो. आता पुढचं मोठं काम होतं रहातं घर खाली करून, साफसूफ करून सामानासहित ७ दिवसात ग्लासगोला स्थलांतरित होणे. माझ्या बायकोनी हे मिशन हाती घेतलंच होतं. किंबहुना बहुतांश कामं तिनेच पार पाडली होती.

आणखी एक आठवडा मी ग्लासगोला कामासाठी जाऊन राहिलो. आठवड्याच्या शेवटी ट्रेननी प्रवास करून सॉलिहलच्या घरी परतलो. खरंतर मी बसचं तिकीट काढलं होतं. पण यूकेमध्ये इतर अनेक गोष्टींप्रमाणे रेल्वेच्या तिकिटांचे दरही खूप वरखाली होतात. ग्लासगो ते बर्मिंगहॅम प्रवासाचं तिकीट २१ पौंड पासून १५० पौंडपर्यंत काहीही असू  शकतं. त्या दिवशी माझं नशीब चांगलं होतं. त्यामुळे २१ पौंडात तिकीट काढून मी महत्वाचे ५ तास वाचवले आणि रात्रीच्या बस प्रवासापासून सुटका करून घेतली.

पुढील दोन दिवस आम्ही भरपूर मेहनत करून “चेक आउट इन्व्हेन्टरी” नावाच्या परीक्षेसाठी सज्ज झालो. तिथे तुम्ही घर सोडताना ते घेतलं तेव्हा जसं होतं तसंच्या तसं परत देताना द्याव लागतं. घर भाड्यानी घेताना एक “चेक इन इन्व्हेन्टरी“ नावाचा कागद तुम्हाला दिला जातो. त्यात अक्षरश: घरातील प्रत्येक खड्या आणि ओरखड्याचा हिशोब असतो. घर सोडताना त्यानुसारच पुन्हा सगळं तपासून घेतात. जो काही फरक असेल त्यानुसार तुमच्या ठेवीतून रक्कम वजा होते.  काही मित्रमंडळींकडून असं ऐकून होतो की “भरपूर कापतात”. तेव्हा दिवसरात्र मेहनत करून आम्ही त्या घराचा कानाकोपरा साफ करत होतो. मागे माझ्या एका मित्रानी तर घर इतकं घासलं होतं की चेक इन इन्व्हेन्टरीत नमूद केलेले काही डाग त्यानी मिटवले. चेक आउट इन्व्हेन्टरीसाठी आलेला मनुष्य ते डाग दिसत का नाहीत म्हणून विचारू लागला.

सामानाचे सुमारे २०-२५ बॉक्सेस, ५ बॅगा आणि बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी इतक्यात आम्ही आमचा संसार गुंडाळला. गॉर्डन नावाच्या एका पन्नाशीकडे झुकलेल्या पण भरभक्कम अशा इसमाने तो लीलया त्याच्या ट्रकमध्ये भरला. त्याच्यापाठोपाठ आम्हीही चावी एजन्टच्या ऑफिसात सोडून बिर्मिंगहॅमवरून ट्रेन पकडली आणि सॉलिहलला अखेरचा रामराम केला.

त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींना भेटलो होतो. एका वर्षातच सगळयांशी वर्षानुवर्षांची मैत्री असल्यासारखी जवळीक निर्माण झाली होती. पाय निघणं कठीण जात होतं पण इलाज नव्हता.

प्रवास सुमारे ४ तासांचा होता. आमची ट्रेन “ग्लासगो सेंट्रल” स्टेशनात दाखल झाली. एकोणीस प्लॅटफॉर्म्स असलेलं हे ग्लासगोतील मुख्य स्टेशन. स्कॉटलंडमध्ये एकंदरीतच लोकसंख्या कमी. त्यामुळे गर्दी कमी. मी तिथे फक्त १ - २ वेळाच ह्या मुख्य स्टेशनवर गर्दी बघितली आहे. तीसुद्धा तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन्स बंद पडल्या तेव्हाच. गर्दी म्हणजे किती तर मुंबईतल्या स्टेशन्सवर दुपारच्या “रिकाम्या" वेळात दिसते तेवढीच.

 तिकीट मशीनमध्ये तिकिटं सरकवून स्टेशनमधून बाहेर आलो. शेरलॉक होम्समध्ये असते तशी काळी, जुन्या प्रकारची टॅक्सी पकडली. तशा प्रकारच्या टॅक्सीसाठीचा माझा हट्ट पाहून बायको मला हसली ती गोष्ट वेगळी. वीस एक मिनिटे प्रवास करून घरापाशी पोहोचलो. सर्वप्रथम हिटर चालू करून आम्ही त्याभोवती कोंडाळं करून बसलो. बंद असल्यामुळे घर खूप थंडगार झालं होतं. पाठोपाठच गॉर्डन सामान घेऊन हजर झाला. आम्ही जाडजूड स्वेटर्स घालूनसुद्धा हिटरपासून हलण्याची हिम्मत होत नव्हती. हा मनुष्य मात्र हलकासा टीशर्ट घालून फिरत होता. वरून आम्हालाच हसत हसत “आर यू फिलिंग कोल्ड?” म्हणून विचारत होता. मग कळलं की तो स्कॉटलंडचाच असल्याने ही थंडी त्याच्यासाठी मामुलीच होती.

पुढे एक दोन दिवसात सामान लावणे, घरातील सर्व गोष्टी समजून घेणे, सुपरमार्केटमधून सामान आणणे, इत्यादी कामात गेले. घर फर्निचरशिवाय घेतल्यामुळे चॅरीटी शॉपमधून सेकंड हँड  फर्निचर विकत घेणे हासुद्धा एक कार्यक्रम पार पडला.

आम्ही तिथे गेल्याच्या दोनच दिवसांनंतर महाराष्ट्र मंडळ, स्कॉटलंड यांचा गुढीपाडव्याचा कार्यक्रम होता. तिथल्या आपल्या माणसांशी ओळख आणि मैत्री करण्याची ही सुवर्णसंधी आम्ही घालवण शक्यच नव्हतं. त्यामुळे ठिकाण थोडंसं दूरवर असल तरी आम्ही त्या कार्यक्रमाला हजर झालो. कार्यक्रम छान झाला. साग्रसंगीत गुढीची पूजा, काही करमणुकीचे कार्यक्रम आणि मग रुचकर जेवण असा बेत पार पडला. बऱ्याचशा पुण्याच्या आणि इतरही ठिकाणच्या लोकांशी ओळखी झाल्या.

त्या हॉलमधील गोल टेबलांभोवती बसून आमच्या आजूबाजूच्या लोकांशी गप्पा चालू होत्या. तिथेच शोध लागला की आम्ही डोंबिवलीच्या जोशांचे बिल्डिंगमधील नसलो तरी प्रांतिक शेजारी झालो होतो. तेसुद्धा ॲनिसलँडमध्येच रहात होते. घरी परत जायच्या वेळी न विचारताच त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीनी लिफ्ट दिली. तिथूनच हर्षद आणि अर्चनाशी आमची खूप छान मैत्री जमली. पुढे मग अनेक वेळा त्या पहिल्या वेळेस चुकामुक झालेल्या गाडीनी आम्ही त्यांच्यासोबत फिरलो.

गुढीपाडव्याच्या ह्या मंगल दिवशी आमचा ग्लासगोमध्ये नवीन परीवारासोबत नवीन प्रवास सुरु झाला. आपुलकीच्या माणसांमुळे स्कॉटलंडसुद्धा आपलंस वाटू लागल. त्या वर्षीच “नूतन वर्षाभिनंदन” आमच्या आयुष्यात खूपच महत्वाचं वळण घेऊन आलं होतं.


- हृषिकेश

hnagarkar@gmail.com

Comments

  1. साध सोप सरळ मनाला भावणार वर्णन 👍

    ReplyDelete
  2. मस्त , पाडवा ! सुरेख लेखन

    ReplyDelete
  3. छानच. नवीन वर्षाचे नवीन मित्र.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न खाणारा ते खाणारा

आतिषबाजी

दिवाना परवाना