स्कॉटलंड, इंग्लंड आणि बरंच काही

लहानपणापासून इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, युनाइटेड किंग्डम वगैरे सर्व एकच आहे अशी समजूत होती. त्यातच कुठेतरी स्कॉटलंड येतं, ज्यांची वर्ल्ड कपसाठी कधीच क्वालिफाय न होणारी क्रिकेट टीम आहे. आणि “स्कॉटलंड यार्ड" नावाचं एक जगप्रसिद्ध पोलीस खातं त्यांच्याकडे आहे. असे माझे खुपसारे गैरसमज होते. तिथे गेल्यावर समजलं की प्रत्यक्षात हे सगळं वेगळं आहे.

इंग्लंड = इंग्लंड

इंग्लंड + वेल्स = ब्रिटन

इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड = ग्रेट ब्रिटन

इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड + उत्तर आयर्लंड = युनाइटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड, अर्थात युनाइटेड किंग्डम किंवा युके

हे सर्व गणित मला तिथे गेल्यावरच कळलं. तिथेच हे ही कळलं की स्कॉटलंड यार्डचा आणि स्कॉटलंडचा काहीएक संबंध नाही. स्कॉटलंड यार्ड हे तर लंडन उपनगरातील पोलिसांचं मुख्यालय आहे. त्याचा मुख्य दरवाजा “ग्रेट स्कॉटलंड यार्ड” नावाच्या रस्त्यावर आहे म्हणून त्याला हे नाव पडलं.

युकेचे हे चार प्रांत खरोखरच खूप वेगळे आहेत. स्कॉटलंडला गेल्यावरच मला शोध लागला की त्यांची स्वतंत्र पार्लमेंट आहे. अर्थात एडिंबरा शहरात असलेली ही  पार्लमेंट अधिकारांच्या बाबतीत आपल्याइथल्या विधानसभेसारखीच आहे. आपल्याकडे राज्यात जसा मुख्यमंत्री असतो तसं तिथे फर्स्ट मिनिस्टर हे पद असतं. गेली अनेक वर्ष स्कॉटलंडमधील एक राजकीय पक्ष किंबहुना एक विचारप्रवाह स्कॉटलंडला युकेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१४ साली तिथे त्यासाठी मतदानही घेण्यात आलं. पण बहुमतानी  युनाइटेड रहाणच पसंत केलं. त्यावरून काही स्कॉटीश लोकच “स्वतःच्याच स्वातंत्र्याच्या विरोधात मतदान करणारा देश" अशी खिल्लीही उडवतात.

स्कॉटलंडमधली भाषाही इंग्लंडपेक्षा बरीच वेगळी आहे. नुसतं उच्चारणच नव्हे तर अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे स्कॉटीश भाषेत खूप वेगळे आहेत. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये ज्याला “small”, “tiny” वगैरे म्हणतात त्याला स्कॉटीशमध्ये “wee” असा शब्द आहे. मला हे सगळे शब्द समजून घेत ते लोक काय म्हणतायत हे समजायला सुमारे महिना लागला. काहीकाही जणांचं बोलणं तर अडीच तीन वर्षांनंतर अजूनही नीट समजत नाही ते वेगळंच. फोनवर वगैरे बोलताना तर अजूनच कठीण जातं.

भाषा जरी वेगळी असली तरी माणसं मात्र आपुलकीने वागणारी. तिथे रहायला गेल्या गेल्या पहिल्याच आठवड्यात माझ्या मुलीला खेळायला एक रॉस नावाचा स्कॉटीश मित्र बिल्डिंगमध्येच मिळाला. अर्थात एकमेकांच्या घरीवगैरे जाण्याइतपत मैत्री नाही झाली. तिथे मुळातच घर ही खूप वैयक्तिक जागा समजली जाते त्यामुळे कोणीच इतक्या सहजपणे एकमेकांकडे जात नाही. घराजवळच एक लायब्ररी होती. तिथे आठवड्यातून दोन दिवस लहान मुलांसाठी गोष्टी गाण्यांचा लहानसा कार्यक्रम होत असे. पहिल्यांदा आपणहून  त्या  रॉसची आईच माझ्या बायकोला व मुलीला तिथे घेऊन गेली.

मुळातच स्कॉटीश लोक मनमोकळी आणि गप्पिष्ट. अगदी ऑफिसमध्येसुद्धा कामाव्यतिरिक्त मिटिंगमध्ये वेळ उरला तर हे लोक तो सत्कारणी लावतात. बालपणी खाल्लेल्या विविध कॅंडीजपासून, सिनेमा, राजकारण अशा अनेक विषयांवर रंजक गप्पा मी ऐकलेल्या आहेत. बाकी काहीच नसेल तर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फ़ुटबॉल तर आहेच. जगातील पहीला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यातच झाला होता. अर्थात गेली काही वर्ष प्रमुख आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी क्वालिफाय न झाल्यानी गप्पांचा मुख्य विषय हा स्कॉटीश  प्रिमियर लीग हा असायचा.

इतर सर्व गोष्टींप्रमाणे तिथे हवामानही बहुरंगी असतं. तिथे प्रत्येक न्यूज बुलेटिनमध्ये हवामानाचा अंदाज हा महत्वाचा भाग असतो. तिथे जाण्यापूर्वी कधी बी बी सीच्या बातम्या पाहायचो तेव्हा वाटायचं की हे लोक हवापाण्याच्या इतक्या काय गप्पा मारतात. कारण आपल्याकडे हवामानाचा रिपोर्ट खूपच सुटसुटीत असतो. दूरदर्शनच्या बातम्यांच्या शेवटी एका  मिनिटात महाराष्ट्रातील ५-६ आणि गोव्यातील एका शहराचं तापमान सांगितलं की आटपतो. फारतर पावसाळ्यात किनारपट्टी भागातील कोळी बांधवांसाठी एखादा इशारा. पण तिथे गेल्यावर आम्हीही नित्य नेमानी त्या हवापाण्याच्या गप्पा ऐकू लागलो. कारण रोज त्यावरूनच कधी बाहेर पडायचं आणि काय कपडे घालून बाहेर पडायचं ते ठरवावं लागतं. त्यातून ग्लासगोलातर सतत “पीर पीर पीर पीर पावसाची” अशी परिस्थिती.

देशात एका वेळी ऋतू जरी एकच असला तरी एकाच वेळी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळं हवामान दिसू शकतं. याचा एक मजेशीर किस्सा टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात ऐकला होता. त्या दिवशी इंग्लंडच्या दक्षिण भागात वादळ आलं होतं. त्यामुळे तिथल्या नागरीकांना तीव्र वाऱ्यापासून सावध रहाण्याचा इशारा होता. मध्य भागात, म्हणजे मँचेस्टर शहराच्या जवळपास अति उष्णतेची लाट होती. त्यामुळे घरातून बाहेर न पडण्याचा त्यांना सल्ला होता. आणि त्याच वेळी ग्लासगोजवळ अतिवृष्टीमुळे “फ्लडिंग”ची शक्यता वर्तवली होती. अर्थात तिथे फ्लडिंगची व्याख्या आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. तिथे फ्लडिंगचा अर्थ पूर असा नसून पाणी तुंबणे असा आहे.

जसजसे दिवस, आठवडे, महिने सरत गेले तसतसं मला स्कॉटलंड समजू लागलं, आवडू लागलं. घर जरा स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही इकडे तिकडे थोडे भटकू लागलो. नाळ जरी मायदेशाशी घट्ट जोडलेली असली तरी ही कर्मभूमी भुरळ घालत होती. तिथलं ऋतुचक्राप्रमाणे बदलणारं निसर्गसौंदर्य मनाला मोहून टाकणारं होतं. दी युनाइटेड किंग्डम मधल्या स्कॉटलंडशी आम्ही हळूहळू जोडले गेलो होतो.

- हृषिकेश

hnagarkar@gmail.com

Comments

  1. ह्रषिकेश अतिशय सहजता तुझ्या लेखनात आढळते त्या प्रदेशाची माहितीही छान मिळत आहे..

    ReplyDelete
  2. ह्रषिकेश अतिशय सहजता तुझ्या लेखनात आढळते त्या प्रदेशाची माहितीही छान मिळत आहे..

    ReplyDelete
  3. स्कॉटलंड चा परिचय सहज सुंदर लेखन

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय

    ReplyDelete
  5. खूप नवीन माहिती. प्रत्यक्ष हा आपला अनुभव असल्यामुळे लेख वाचनीय वाटला.

    ReplyDelete
  6. खूप छान आहे लेख. मनाला भिडणारं इतकं साधं वर्णन. अभिनंदन आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. संस्कृती आणि प्रादेशिक माहिती स्मजते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न खाणारा ते खाणारा

आतिषबाजी

दिवाना परवाना