ग्लासगो भ्रमण - पूर्वार्ध
ग्लासगो शहराच्या मध्यभागी
असलेल्या जॉर्ज स्क्वेअरपासून ही टूर सुरु होते. शहरातील अशा मुख्य स्क्वेअर्समध्ये
असतात तसे इथेही ८ पुतळे आहेत. यापैकी मला परिचित एकच होता तो म्हणजे वाफेच्या इंजिनाचा
शोध लावणाऱ्या जेम्स वॉटचा. हा वैज्ञानिक ह्याच प्रांतातला होता हे मात्र मला ठाऊक
नव्हतं. लहानपणापासून “चहाच्या किटलीत पाणी उकळताना पाहून त्याला ही आयडिया सुचली"
एवढीच दंतकथा मला ठाऊक होती. या पुतळ्यांव्यतिरिक्त इथे पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या
ग्लासगोतील सैनिकांचं स्मारकही आहे. उरलेल्या भागात मग लोकांना पसरण्यासाठी लॉन, चालण्यासाठी
रस्ता आणि बसण्यासाठी बाकडी आहेत. जॉर्ज स्क्वेअरच्या चहूबाजूंनी जुन्या आलिशान इमारती
आहेत. त्यामध्ये बरीच सरकारी आणि खाजगी ऑफिसेस आणि हॉटेल्स आहेत. एका बाजूला “क्वीन
स्ट्रीट” नावाचं भलं मोठं स्टेशन आहे. सतत वर्दळ असलेला हा स्क्वेअर ही पुढे रोजच्यात
आमची जेवणानंतर पाय मोकळे करायला यायची आवडती जागा होती. अर्थात ज्या दिवशी पाऊस आणि
बर्फ नसेल तेंव्हाच.
युकेतील बाकी बऱ्याच शहरांप्रमाणे
ग्लासगोमध्येही डबल डेकर बसेस आहेत. त्यापैकी टूरसाठी खास सोय केलेल्या बसेसचं वरच्या
मजल्यावरील छप्पर काढलेलं असतं. माझ्या मुलीनी त्याला “टकलू बस" असं नामकरण करून
टाकलं. त्या बसमध्ये वरच्या डेकवर छानशी जागा बघून आमचं ग्लासगो भ्रमण सुरु झालं. त्या
बसचं एकदा तिकीट काढलं की कितीही वेळा चढा आणि उतरा. दिवसभर त्या बसेस त्यांच्या
ठरलेल्या रुटनी फिरत असतात.
जॉर्ज स्क्वेअरपासून आमची
टूर सुरु होऊन बुकॅनन बस स्टेशन ओलांडून पूर्वेकडे वळली. हे तेच बस स्टेशन होत जिथे
मी सर्वप्रथम ग्लासगो शहरात पाऊल ठेवलं होतं. थोड्याशाच अंतरावर होता पहिला स्टॉप,
तो म्हणजे ग्लासगो कॅथेड्रल. स्कॉटलंडमधील सर्वात जुनं कॅथेड्रल आणि ग्लासगोतील सर्वात
जुनी इमारत अशी ह्याची ओळख. बाराव्या शतकात बांधलेली ही भव्य वास्तू हा स्कॉटीश गॉथिक वास्तुकलेचा एक उत्तम
नमुना समजला जातो. ग्लासगोतील सेंट मंगो यांनी प्रथम चर्च स्थापन केलं आणि तिथेच पुढे
हे कॅथेड्रल स्थापन केलं गेलं असा समाज आहे. सुमारे १४५१ साली इथेच सर्वप्रथम ग्लासगो
युनिव्हर्सिटीची सुरुवात झाली. पुढे काही वर्षांनी युनिव्हर्सिटी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित
केली गेली.
ह्या कॅथेड्रलच्या बाजूलाच
एक लहानशी टेकडी आहे. त्या टेकडीवर ग्लासगो नेक्रोपोलिस नावाची दफनभूमी आहे. आम्ही
त्या टेकडीवरही फिरून आलो. तिथून ग्लासगो शहर आणि कॅथेड्रल छान दिसतं.
तिथून पुन्हा बसमध्ये बसून आम्ही शहराच्या पूर्वेकडील भागातून फिरलो. बसमध्ये आपल्याला हेडफोन दिलेले असतात. त्यातून बस ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथली माहिती सांगितली जाते. त्यात वेगवेगळ्या भाषा निवडण्याचीही सोय असते. शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक वास्तूंच्या आणि फ्लाय ओव्हर्सच्या भिंतींवर खूप सुंदर भली मोठी चित्र काढलेली आहेत. त्यात विशेष लक्षात राहिलेल्या एका चित्रात सहाव्या शतकात होऊन गेलेले सेंट मंगो हे मॉडर्न वेशात दिसतात. जॅकेट आणि कानटोपी घातलेल्या सेंट मंगोच्या ह्या चित्रात एक सुंदर रॉबिन पक्षी हातावर बसला आहे तर दुसरा त्यांच्या डोक्याभोवती उडत आहे. एका आख्यायिकेनुसार सेंट मंगोंनी त्यांच्या मित्रांनी मारलेल्या एका रॉबिन पक्षाला पुनर्जीवित केलं होतं. त्याचंच हे आधुनिक युगातील चित्रीकरण आहे.
सिटी सेंटर लगतच जरासा
पूर्वेकडील भाग आहे त्याला मर्चंट सिटी म्हणतात. पूर्वी शहरातील धनाढ्य व्यापाऱ्यांची
निवासस्थानं असलेला हा भाग असल्यामुळे त्याला हे नाव मिळालं. त्यात बहुतांश व्यापारी
जहाज वाहतूक आणि चहा, साखर, टोबॅको, इत्यादी मालाचा व्यापार करून श्रीमंत झालेले होते.
आता मात्र तिथे अनेक दुकान, शोरूम्स, रेस्टोरेंट्स, बार, मार्केट्स यांनी गजबजलेला
भाग दिसतो.
शहराच्या मध्यवर्ती भागात
सेंट इनॉक आणि बुकॅनन गॅलरीज असे दोन मोठे मॉल्स आहेत. बुकॅनन
गॅलरीजसमोरचा जो भलामोठा रस्ता आहे त्याला बुकॅनन स्ट्रीट असं नाव आहे. बुकॅनन नावाच्या
एका खूप श्रीमंत टोबॅको व्यापाऱ्याच्या नावावरून ह्या रस्त्याचं नामकरण झालं आहे. ह्या
रस्त्यावर दुतर्फा मोठाल्या शोरूम्स आणि दुकानं आहेत. हेच ग्लासगोतील शॉपिंगचं मुख्य
ठिकाण. ह्या रस्त्यावर नेहमी स्ट्रीट आर्टिस्ट काहीतरी मनोरंजक करताना दिसतात.
कुणाच्या गाण्याचे सूर आसमंतात पसरलेले असतात तर कोणी स्कॉटिश वेशभूषेत बॅगपायपर वाजवताना
दिसतो. कोणी जादूचे प्रयोग दाखवून लोकांचं मनोरंजन करत असतो. कोणी सायकलवर कसरती करून
प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत असतो. ह्याच रस्त्यावर मी एका स्कॉटीश माणसाला आपल्या
सतार वाद्यावर यमन राग वाजवतानाही पाहिलं आहे. कायमच गजबज असलेला हा रास्ता आहे.
ह्याच रस्त्यावर मी एक
मजेशीर गोष्ट बघितलेली आठवते. इथल्या ऍपलच्या मोठ्या शोरूमच्या दारासमोरच एक जण ऍपल
फोन रिपेअर करणाऱ्या दुकानाच्या जाहिरातीचा बोर्ड घेऊन उभा होता. थेट गिऱ्हाईकापर्यंत
जाहीरात पोहोचवण्याचा याहून उत्तम प्रकार काय असू शकतो?
स्कॉटलंडमधील मूळ भाषा
आहे गेलिक. ही भाषा आयर्लंडमधून इथे आली असं मानलं जातं. आता मात्र ती अगदीच नामशेष
होण्याच्या मार्गावर दिसते. आज घडीला स्कॉटलंडच्या फक्त १ टक्का जनतेला ही भाषा ठाऊक
आहे. मात्र सगळ्या रेल्वे स्टेशन्सवर इंग्लिश (खरंतर स्कॉटीश म्हणायला पाहिजे नाहीतर
स्कॉटीश लोक रागावतील) बरोबर गेलिक भाषेतही नावं लिहिलेली असतात. त्यातील काही नावांचं
आपल्या भाषेशी मजेशीर साधर्म्य वाटतं. उदाहरणार्थ ग्लासगो सेंट्रल स्टेशनचं गेलिकमधील
नाव आहे Glaschu Mheadhain जे की ग्लाशु मध्य सारखं वाटतं.
युकेमध्ये सर्व मोठ्या
शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वे सारख्या रस्त्यांना मोटरवेज किंवा एम रोड्स असं म्हणतात.
त्यापैकी ग्लासगो आणि एडिंबरा या स्कॉटलँच्या दोन मुख्य शहरांना जोडणारा एम ८ रस्ता
ग्लासगोच्या साधारण मध्यातून जातो. आत्तापर्यंत आमची सिटी टूर ही शहराच्या पूर्व भागात
चालू होती. ग्लासगो सेन्ट्रल स्टेशन ओलांडल्यावर आता शहराच्या पश्चिम भागात आमचा प्रवास
होणार होता. ह्या पूर्वार्धानंतर ग्लासगो भ्रमणाचा पश्चिमार्ध घेऊन मी पुन्हा येईन,
लवकरच. माहित नाही पश्चिमार्ध असा खरंच काही शब्द असतो का ते. काही असो, पण मी पुन्हा
येईनच.
- हृषिकेश
hnagarkar@gmail.com

छान वर्णन केले आहे
ReplyDeleteखूप सहज सुंदर भाषेत ग्लासगो चे शब्दचित्र ..
ReplyDelete