स्कॉटीश लॉक्स

युकेला जी काही चार वर्ष मी होतो त्यात आवर्जून एक गोष्ट केली ती म्हणजे दर वर्षी भारतभेट. कामानिमित्त कुठेही गेलो तरी मन आपल्या मातीत, आपल्या माणसांतच अडकलेलं असतं ना! २०१८ च्या मेपर्यंत आम्हाला मायदेशी जाऊन आल्याला आठ एक महिने झाले होते. तेंव्हा मन पुढच्या भेटीची वाट बघू लागलं होतं. मात्र मी ग्लासगोच्या ह्या प्रोजेक्टमध्ये नवीनच रुजू झालो होतो. लगेच मोठी सुट्टी घेणं शक्य नव्हतं.

माझ्या बायकोची एक कॉलेजमधली मैत्रीण, श्रुती ग्लासगोतच राहते. तेंव्हा तिच्यासोबत बायको आणि मुलगी जाऊन येतील असं ठरलं. लगेच तिकिटं  काढली, बॅगा  भरल्या आणि त्या दोघी निघायला सज्ज झाल्या. अर्थातच माझ्यासाठी त्यांना एअरपोर्टवर बाय करणं तितकंसं  सोपं नव्हतं. त्यांना सोडून मी ऑफिसला गेलो तेंव्हा ऑफिसमधील एका अनुभवी मित्रानी समजावलं की पहिले काही दिवस मुलीची खूप आठवण येईल. मग दोन चार दिवस बायकोची आठवण येईल. मग मात्र सगळं नॉर्मल वाटू लागेल. आणि झालंही अगदी तसंच.

त्या एकटेपणाच्या दिवसांमध्ये मी जरा नित्यनेमानी चालायला जाऊ लागलो. ग्रेट वेस्टर्न रोड हा माझ्या घराजवळचा मोठा हायवे. त्या रस्त्यालगत दुतर्फा असलेली झाडं स्प्रिंगमध्ये सुंदर रंगीबेरंगी फुलांनी डवरलेली असतात. कॅमेरापेक्षाही मनात साठवून ठेवण्यासारखं हे नयनरम्य दृश्य. त्या रस्त्यावर एक जागा मला फार आवडायची. सुमारे दोन अडीच मैल चालून गेल्यावर एका ठिकाणी ग्लासगो एअरपोर्टला उतरायला येणारी विमानं अगदी जवळून दिसतात. असं डोक्यावरून जवळून विमान जाताना पहायला भारी वाटतं. मी लहान मुलासारखा कधीकधी तिथे विमानाची वाट बघत थांबायचो.

स्कॉटलंडची कहाणी ज्याच्याशिवाय अपूर्णच राहील अशी गोष्ट म्हणजे इथले लॉक्स. स्कॉटीश  भाषेत लेक किंवा तळ्याला लॉक (loch) असा शब्द आहे. लहान मोठी अशी अनेक सुंदर सुंदर लॉक्स सगळीकडे पाहायला मिळतात. काही लॉक्स  इतकी मोठी आहेत की पूर्वीच्या काळी त्यांचा  जलवाहतुकीसाठी नियमित वापर व्हायचा. आता तिथे पर्यटकांना फिरवण्यासाठी बोटी चालतात. सततच्या पावसामुळे हे लॉक्स कायमच पाण्यानी भरलेले असतात.

काही काही ठिकाणी कायाकिंगची सोय आहे. दोघेच बसू शकतील अशी लहानशी लांबट होडी आपण वल्हवत लॉकमध्ये फिरून यायचं. अशाच एका लॉक आर्ड नावाच्या ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही म्हणजे मी आणि निनाद, श्रुतीचा नवरा. बायको माहेरी गेल्याने “विमनस्क” मनस्थितीत असलेले आम्ही दोघ जरासे भटकायला बाहेर पडलो. लॉक आर्डला कायाकिंग केलं. सर्व बाजूंनी डोंगराळ भाग आणि मध्ये हे तळ आहे. तळ्याच्या शांत पाण्यावर पडणारं हिरव्यागार डोंगराचं प्रतिबिंब खूपच नयनरम्य दिसतं. त्या शांततेत आवाज करणारे फक्त वारा, पक्षी आणि आपणच. कायाकिंगनंतर अर्थातच खूप भूक लागली होती. तेंव्हा सरळ ग्लासगो गाठलं आणि एका रेस्टॉरंटमध्ये मस्तपैकी डोसा आणि बिर्याणीवर ताव मारला. विकेंडचा याहून चांगला विनिमय काय असू शकतो?

ग्लासगोपासून जवळच असलेलं आणि माझं व माझ्या बायकोचं आवडीचं ठिकाण म्हणजे लॉक लोमंड. बऱ्याच वेळा तिथे जाण्याचा योग  आला. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे तिथे जायला थेट ट्रेन होती. बॅलॉक नावाचं स्टेशन लॉक लोमंडच्या अगदीच बाजूला आहे. ७१ वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं हे तळं ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठं तळं आहे. तिथे एकदा आम्ही क्रूझ बोटीतून फिरून आलो होतो. आजूबाजूला पसरलेली नॅशनल पार्कची घनदाट झाडी, डोंगररांगा आणि त्यात मधून मधून डोकावणारी तुरळक घरं. फारच मनोहर दृश्य होत ते.

तिथे जलाशयाच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी लाकडाची बाकडी आणि टेबलं कायमची ठोकून ठेवली आहेत. इतकंच नव्हे तर त्या टेबलांना बार्बेक्यूसाठी खास सोय केलेली आहे. एकदा आम्हीही तिथे मित्रमंडळींसोबत बार्बेक्यूची मजा अनुभवली होती. कधी फारच छान ऊन बिन पडलं असेल तर मग काय, भरपूर गर्दी असते. गर्दी म्हणजे काय अगदी भुशी डॅम मनात नका आणू, बसायला टेबल मिळणं थोडस कठीण होतं  इतकंच.

लॉक लोमंड परिसरातलं आणखीन एक आकर्षण म्हणजे “सी लाईफ” ऍक्वेरियम. खूप मोठं नसलं तरी बच्चे कंपनीला नक्कीच खुश करेल असं हे ठिकाण आहे. इकडे तिकडे तुरुतुरु पळणारे आणि मधेच पाण्यात सूर मारणारे ऑटर्स, निवांतपणे जलविहार करणारे स्टिंग रे आणि कासवं, भक्ष्याच्या शोधात फिरणारे शार्क, अनेक रंगीबेरंगी लहान मासे, पांढऱ्या आणि नारंगी रंगाचे क्लाऊन फिश असे एकाहून एक सरस जीवसृष्टीचे अविष्कार इथे पाहायला मिळतात.

असंच  स्कॉटलंडमधलं आणखी एक प्रसिद्ध लॉक आहे ते म्हणजे लॉक नेस. ह्याचा आकार लांबट आहे. ह्या लॉकला विशेष प्रसिद्धी मिळाली ती त्यात राहणाऱ्या “नेसी" मॉन्स्टरच्या अख्यायीकेमुळे. काळ्याकुट्ट रंगाचा अजस्त्र जीव ह्या पाण्यात दिसतो अशी एकोणिसाव्या शतकापासून चालत आलेली आख्यायिका आहे. गुगलवर शोधलं तर फोटोशॉप केलेले त्याचे खूप छान छान फोटो पाहायला मिळतात. मुळातच आजूबाजूच्या डोंगरातून वाहून येणाऱ्या झऱ्यांमुळे ह्या लॉकच आधीच “गढुळाचं” असलेलं पाणी ह्या अख्यायीकेमुळे अजूनच ढवळलं गेलंय.

संख्येनी सुमारे तीस हजाराच्या घरात असलेली ही लॉक्स मला स्कॉटलंडची शान वाटतात. मुळातच नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलेल्या स्कॉटलंडमध्ये हे जलाशय म्हणजे दुधात साखरच. त्यांच्या दर्शनाशिवाय स्कॉटलंडची यात्रा होऊच शकत नाही. 

- हृषिकेश

hnagarkar@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

न खाणारा ते खाणारा

आतिषबाजी

दिवाना परवाना