न खाणारा ते खाणारा
डिस्क्लेमर: मी खाणारे किंवा न खाणारे कोणाच्याही बाजूचा नाही. मी मानतो की ह्या बाबत प्रत्येकाचं मत हे वैयक्तिक आहे आणि सर्वांच्या मतांचा मी समान आदर करतो. पुढील लिखाणाचा विनोद निर्मिती (जमल्यास) इतकाच हेतू आहे. तेंव्हा भावना वगैरे दुखावून घेऊ नका.
खूप नाजूक विषय आहे म्हणून सुरुवात डिस्क्लेमरनी.
असो, तर मी न खाणाऱ्यांमध्ये जन्मलो. आता ते काही
आपल्या हातात नसतं. मात्र ते बदलणं आपल्या हातात असतं. तसं करावंसं वाटलं म्हणून मी
केलं.
आता न खाणाऱ्यांमध्ये म्हणजे घरात अगदीच काही
सगळे सोवळे होते अशातला भाग नाही. किंबहुना वडील मर्चंट नेव्हीत नोकरी करत असल्याने
त्यांनी आयुष्यातला बराच काळ “खाणारे" म्हणून व्यतीत केला. आणि त्यानंतर ते “न
खाणाऱ्यांच्यात" परतले होते. पण मुख्य माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रभाव टाकणारी अर्थातच माझी आई ही ११०
टक्के “न खाणाऱ्यांमधली” आहे. वरचे १० टक्के
यासाठी की ती बरेचसे दुग्धजन्य पदार्थही खात
नाही. त्यामुळे स्वाभाविकच मी “न खाणाऱ्यांमध्ये" पडलो. अंड लहानपणापासून खातोय.
पण अंड खाणाऱ्याला खाणारे आणि न खाणारे दोघेही
त्यांच्यातला मानत नाहीत.
नंतर पुढे कॉलेज आणि नंतरच्या काळात संगतीचा व्हायचा
तो परिणाम झाला आणि मी “खाणारा" बनू लागलो. मला आठवतंय त्यानुसार सुरुवात झाली
ती माझ्या एका अशाच हृदयपरिवर्तन झालेल्या भावासोबत. चिकन तंदूर खाऊन जी काही
“चटक" निर्माण झाली ती आयुष्य बदलून टाकणारी होती. तोपर्यंतची आयुष्यातली बरीच
वर्ष वाया गेल्याची खंत वाटली. पण तरीही “देर आये दुरुस्त आये" असं वाटलं. चवींच्या एका अद्भुत विश्वात माझा प्रवास
सुरु झाला.
आता ह्या “न खाणारा" ते “खाणारा" प्रवासात
सर्वात मोठी अडचण म्हणजे "काय खायचं" तेच समजणं प्रथम अवघड जातं. कोणती हाडं कुठे मोडायची
आणि कुठे सोडायची हा एक प्राथमिक शिक्षणाचा भाग आहे आणि तो शिकायला मला बऱ्यापैकी वेळ
लागला. हळू हळू मिळेल ती संधी साधून प्रयत्नपूर्वक प्रगती करू लागलो.
तरीही त्यातल्यात्यात चिकनचा मामला बराच सोपा
आहे. त्यातली पुढील कसोटी म्हणजे मासे. अर्थात त्यातही मी सुरुवात ही कोळंबीच्या अगदी बाळबोध पण अत्यंत चविष्ट अशा प्रकारापासून
केली. नंतर अनेक “काट्याकुट्यातून" मार्ग काढत मी आता बऱ्यापैकी मासे खाऊ शकतो.
सुरमई वगैरेतर मी अगदी अलीकडे गोव्याला धड खायला शिकलो. अर्थात अजूनही बरंच शिकण्यासारखं
आणि चाखण्यासारखं बाकी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
आता खाणाऱ्यांचा विषय आला की त्यासोबतच उपविषय असतो तो म्हणजे “दिवस पाळणाऱ्यांचा".
ह्याबाबत पुन्हा प्रत्येकाचा हिशोब खूपच वेगळा असतो. मी जेव्हा नवीनच खाणाऱ्यांच्यात
समाविष्ट झालो होतो तेंव्हा ऑफिसात रविवार सोडून इतर प्रत्येक
दिवस पाळणारा कोणी न कोणीतरी होताच. आता आम्ही मुळातच सगळेच दिवस पाळणाऱ्यांमधून आलेलो
असल्यामुळे कोणता दिवस पाळावा याबद्दल थोडासा संभ्रम होता. पण माझ्या एका गुरुनी तोसुद्धा
दूर केला. त्यानी मला समजावलं, की रोज सूर्य चंद्र ग्रह तारे सगळे सारखेच उगवतात आणि सारखेच मावळतात. जर त्या विधात्यानीच दिवसा-दिवसांमध्ये काही भेदभाव केलेला नाही, तर
त्यात भेदाभेद करणारे आपण कोण? हा गुरुमंत्र आत्मसात करून मी कोणताच दिवस न पाळण्याचं ठरवलं.
पुढे बहुतेक सर्वांचं होतं तसच माझंही लग्न झालं. माझी बायकोसुद्धा “न खाणारीच”.
खरं तर कुंपणावरचीच. तिचं हृदयपरिवर्तन करायचा
मी गेलं दशकभर प्रयत्न करतोय पण अजून यश येत नाही. अजूनही ती नुसताच चिकनचा रस्सा आणि
कधीतरी कोळंबी खाते हो! तिनी एकदा अगदी घरी चिकनला हात न लावता चिकन करीसुद्धा बनवली.
नाही असं नाही. पण तरीही मला “खायला” फारशी घरची कंपनी मिळत नाही.
तर असा आहे माझा न खाणारा ते खाणारा हा प्रवास
जो अजूनही चालूच आहे. नवीन नवीन चवींचा शोध हा माझ्या आवडीचा विषय आहे. तेव्हा कधी
छानपैकी बेत असेल तर सांगा.
- हृषिकेश
Nice blog👍
ReplyDeleteWrite more regularly:)
ReplyDelete